घरबंदी भाग 7-सो गया है रस्ता......

दोन-तीन दिवसांपासून हे गाणं मनात घोळत होतं.

"सो गयी है सारी मंझिले ,

सो गया है रस्ता.........."

खरंच या अवघड काळात ,किती लोकांची स्वप्न किती जणांचं जगणं, रस्ता विसरलं असेल. किती जण भरकटले असतील ,जुन्या रस्त्यापासून लांब गेले असतील !!!!

आपण मध्यमवर्गीय तसे, एक रूढ रस्ता पकडून चालत राहतो .अर्थात, या वर्गात जन्मलो हे आपलं भाग्यच म्हणायला हवं !!!! त्यामुळे ,कुठल्याही आपत्तीत आपण खूप डळमळत नाही. साधी रहाणी, नेमस्त जगणं, बचतीची सवय ,भविष्याची तरतूद करण्याची सवय, यामुळे काही दिवस तग धरणं ,आपल्याला फारसं अवघड जात नाही.

असो!! रस्ता म्हटल्यावर, जरा वेगळीच वाट सापडली. मला हे गाणं आठवल्यानंतर असं वाटलं ,की सगळे रस्ते म्हणतायेत ,"सो गया है, आदमी "!!!!

आपण या घरबंदीत, घरातच अडकलो आणि आपलं मन रमवण्यासाठी नाना उद्योग केले .पण या रस्त्यांनी काय करायचं ??आपली पावले पडली , तर ते कसे शहारुन जात. पण ही पावलं घरात अडकली !!! छोट्या मुलांचं क्रिकेट नाही, पळापळी नाही, शाळेकडे पळत जाणारी ,दंगा करणारी पावलं नाहीत. डोक्यावर ,हातात ,गाडीवर ओझं घेऊन जाणा-यांचे थकलेले पाय नाहीत .कॉलेज तरुण-तरुणींचे नाचरे उत्साही पाय नाहीत .ज्येष्ठ नागरिकांचे मोकळे करण्यासाठी बाहेर पडलेले ,थकलेले ,पण खंबीर पाय नाहीत !!!!!

म्हणून इतके दिवस हे रस्ते उदास होते. आता जरा खूष झाले असतील ,कारण हळूहळू वर्दळ वाढायला लागली आहे. पावलं आपल्या आपल्या उद्योगाला लागली आहेत.

मला किती रस्ते आठवले. आमचं दिंडोशी गाव ,(हो,ते तेंव्हा गावचं होतं ) स्टेशनपासून दोन अडीच मैल लांब. तो लांबच लांब रस्ता चालताना, वाटेतल्या भोकरीच्या झाडाखाली ,आम्हा लहान मुलांची हमखास विश्रांती व्हायची !!!! दहावीच्या परीक्षेनंतर, आईच्या मागे लागून घेतलेली ,सेकंडहॅंड सायकल, पुढे पुण्याला येईपर्यंत याच रस्त्यावरून धावली.

मग अनेक वर्ष ,पुण्यातले अनेक रस्ते स्वतःच्या गाडीवर, नंतर बसने,रिक्षाने आणि आता कधी कधी कॅबने पालथे घातले. आता VRS घेतल्यानंतर ,बँकेचा रस्ता अधून-मधून दिसतो .पण आता वळणावर गुलमोहराचा बहर घेऊन सामोरा येणारा रस्ता ,जो फिरायला गेल्यावर भेटायचा ,त्याची आठवण येते !!! मैत्रिणीच्या घरी जाताना दहा मिनिटांचा रस्ता, दोन मिनिटात संपल्यासारखा वाटायचा ,तोही आता दिसत नाही !! बस किंवा रिक्षाच्या प्रवासात रस्त्यातल्या खुणा बघत-बघत जायची मजा जरा विसरायला झाली आहे !!!!

म्हणूनच या लेखाच्या माध्यमातून, ते सगळे रस्ते आठवले .तसे सतत आपल्या बोलण्यात हा शब्द नकळत येतच असतो. " त्या माणसाला या दुष्टांनी रस्त्यावर आणलं !!", "बघ गोड बोलून त्याने तिची कशी वाट लावली"," वाट चुकलेला माणूस", " ह्याला मार्गावर आणण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे " !!!!!

असे सगळे वाक्प्रचार ऐकत असताना, या रस्त्याला काय वाटत असेल नाही का?? असं सारखं माझ्या मनात येत राहतं !!!!!

शैला परांजपे-17 जून 2020