विक्शनरी:विक्शनरी नमुना पत्र१

  • Marathi Wikipedians have not reached to any consensus about formatting of this letter,please discuss your views at चर्चा page of this article.

प्रति,

विभाग प्रमुख
मराठी भाषा विभाग,
पुणे विद्यापीठ,
पुणे

विषय: इंटरनेटवरील 'मराठी विक्शनरी' (मुक्त शब्दकोश) आणि 'मराठी विकिपीडिया' (मुक्त विश्वकोश) प्रकल्पांसंदर्भात मराठी भाषेच्या समस्त अभ्यासकांना आवाहन .

सप्रेम नमस्कार, विनंती विशेष.

मराठी विकिपीडिया हे इंटरनेटवरील मराठी ज्ञानकोशाच्या विकासास वाहिलेले मुक्त, अव्यापारी आणि समाईक संकेतस्थळ आहे. मराठी विकिपीडिया व त्याच्या विक्शनरी, विकिबुक्स, विकिक्वोट इत्यादी प्रकल्पात सहयोगी पद्धतीने लेखन केले जाते.

मराठी भाषेच्या अभ्यासकांचा http://mr.wikipedia.org/ येथे लेखन सहयोग मिळाला तर मराठी भाषेचा ज्ञानभाषा म्हणून संवर्धन करणारे हे दालन अधिकाधिक समृद्ध होईल.

सोबत जोडलेले आवाहन आणि परिपत्रक मराठी भाषा विभाग प्रमुख या नात्याने आपण आपल्या सर्व परिचित मराठी भाषेच्या अभ्यासकांना माहितीसाठी पाठवावे. तसेच विभागाच्या आणि वाचनालयाच्या सूचना-फलकावर लावावे असे नम्र निवेदन आहे.

आपला विनम्र,


माझी सूचना:- या पत्राच्या प्रतिलिपी मुंबई, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, राहुरी, रत्नागिरी, जळ्गाव(की धुळे?) या विद्यापीठांनापण पाठवाव्यात. तसेच काही Deemed universities सुद्धा आहेत, त्यांचापण विचार व्हावा. मुख्य पत्र भाषासंचालनालय, मंत्रालय, मुंबई येथे पाठवावे. पत्राच्या मसुद्यात कोणी अधिक व रास्त सुधारणा सुचवल्या तर त्या विचारात घ्याव्यात.

आवाहन : मराठीप्रेमी लेखक पाहिजेत!

संपादन

'मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी विविध विषयांवर लेखन करणारे लेखक पाहिजेत!' अशा आशयाची जाहिरात कुठे येईल असे वाटते? नाही ना? पण इंटरनेटवरील मराठी विकिपिडियावर (http://mr.wikipedia.org) या आशयाचे आवाहन करण्यात आले आहे. एवढेच नाही, तर त्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आज तब्बल सव्वाचार हजारांहून अधिक लेख या मुक्तकोशावर वाचता येतात, हे त्याचेच द्योतक.

' विकिपीडिया' ही आज इंटरनेटवर गुगलपाठोपाठ लोकप्रिय होत असलेली साइट आहे. जगभरातल्या २२९ भाषांमध्ये सुरू असलेल्या या प्रकल्पात आजवर एकूण ४६ लाखांच्यावर लेख लिहिण्यात आले आहेत. इंग्रजीतील विकिपीडिया हा तर तुफान लोकप्रिय झाला असून तिथल्या लेखांची संख्या साडेबारा लाखांच्या आसपास आहे. त्या तुलनेत मराठी विकिपिडियाच्या विस्ताराची गती मंद वाटत असली तरी मराठी घरांमधील कम्प्युटर आणि इंटरनेटच्या प्रसाराची धीमी गती पाहता ती कमी आहे, असेही म्हणता येत नाही!

मुळातच एखादी माहिती हवी असेल तर कोश धुंडाळण्याची सवय आपण विसरून गेलो आहोत. मराठीत विश्वकोश, साहित्यकोश, संस्कृतीकोश, वाङ्मयकोशांची परंपरा असली तरी ते अद्ययावत करण्यातले सातत्य दिसत नाही. त्यातील विश्वकोशाचा आताच सुरू झालेला प्रयत्न वगळता दुर्दैवाने हे कोश इंटरनेटवर सहज उपलब्ध नाहीत. या पार्श्वभूमीवर विकिपीडियाचा हा प्रयत्न विशेष उल्लेखनीय असून त्यात माहिती शोधत फिरणे हा रोचक अनुभव आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा कोश सर्वांसाठी खुला असून प्रत्येकाला आपल्या आवडीच्या विषयावर लिहिण्याची मुभा आहे. सध्यातरी अभियांत्रिकी, इतिहास, कला, क्रीडा, गणित, तंत्रज्ञान, धर्म, निसर्ग, भूगोल, विज्ञान, समाज, कम्प्युटर, संस्कृती असे सर्वसाधारण तर भारत आणि महाराष्ट्र हे विशेष विभाग आहेत. या मुख्य विभागांमध्ये अन्य पोटविभाग करण्यात आले असून त्यात विषयवार लेख उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

विकिपीडिया समूहाचा भाग असणार्‍या 'विक्शनरी', 'विकिबुक्स', 'विकिकोट्स' आदी वेबपेजेसच्या लिंक्सही मराठी विकिपीडियाच्या होमपेजवर क्लिक करता येतात. 'विक्शनरी'मध्ये ऑनलाइन शब्दकोश पाहता येतो, तर 'विकिबुक' या लिंकवर ज्ञानेश्वरी, गीताई आदी काही वाचता येते. 'विकिकोट्स' या पेजवर विचार, सुविचार, म्हणी, वाक्प्रचार यांचा संग्रह करण्यात आला आहे.

मराठी भाषेतील या अभिनव प्रकल्पात प्रत्येकाने योगदान द्यावे, हे अपेक्षित असले तरी 'कसे लिहावे' हे अनेकांना माहीत नसते. त्यासाठी संपूर्ण मदत करणारा लेखही विकिपीडियाच्या होमपेजवर ठेवण्यात आला आहे. यात फॉन्ट, अपलोडिंग, दुरुस्ती अशा अनेक प्रकारच्या कामांविषयी विस्तृतपणे लिहिलेले आढळते. तसेच या संदर्भात काही चर्चा अपेक्षित असेल तर ती करण्यासाठी 'विकिपीडिया चावडी'चा पर्याय उपलब्ध आहेच.

आजकाल ब्लॉग लिहिणे हा ट्रेन्ड मराठीत रुजतो आहे. यामुळे इंटरनेटवर लिहिणार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे. या ब्लॉगलेखकांनी आपली ही आवड विकिपीडियासारख्या मुक्तकोशाच्या योगदानासाठी वापरली, तर मराठीचे हे दालन अधिकाधिक समृद्ध होईल.

- नील वेबर (सौजन्य महाराष्ट्र टाइम्स दिनांक २७ जुलै २००६.)

ता.क. : मराठी विकिपीडियावरील लेखांच्या संख्येचा आलेख सतत वाढता आहे आणि तो लौकरच १०,००० लेखांची मजल गाठेल असा विश्वास आहे. त्यामुळे दैनिक मटातील बातमीत लिहिल्यापेक्षा आकडेवारी अधिक आहे.

परिपत्रक

संपादन

'मराठी विक्शनरी' हा एक आंतरजालावरील मुक्त शब्दकोश प्रकल्प असून 'मराठी विकिपीडिया' या मुक्त विश्वकोशाचा सहप्रकल्प आहे. सध्या 'मराठी विकिपीडिया'तील १००० हून अधिक मराठी सदस्यमंडळी या मराठी विश्वकोशात भर घालत आहेत.'मराठी विकिपीडिया'च्या या प्रयत्नांना जोड देण्यासाठी स्वयंपूर्ण 'मराठी विक्शनरी' शब्दकोशाची गरज आहे.

व्याकरणकार पतंजलींनी म्हटल आहे की कुंभारवाड्यात लोक मडकी घडवून घेण्याकरता जातात पण व्याकरणवाड्यात शब्द घडवून द्या असे सांगण्या करता कुणी येत नाही ; पण आज मराठी विकिपीडिया आणि मराठी विक्शनरी यांच्या रूपाने साक्षात मराठी भाषा मराठीशब्द द्या ! मराठीशब्द द्या! असा शब्दांचा जोगवा मागत आहे. ज्ञान दानाने वाढते या ऊक्तीवर विश्वास ठेवणारे मराठी भाषेचे व्यासंगी अभ्यासक आणि विद्यार्थी मराठी विकिपीडिया आणि मराठी विक्शनरीत भरभरून शब्ददान करतील अशी आशा आहे.

तसेच मराठी भाषेच्या अभ्यासकांना भाषा व व्याकरणाचे विश्लेषण करताना विविध प्रकारे शब्द,वाकप्रचार,वाक्य,अवतरणे इत्यादींचे "वर्गीकरण" करावे लागू शकते.

हा अभ्यास करताना मराठी विक्शनरी शब्दकोशाच्या प्रणालीतील अतिसुलभ "वर्गीकरण" क्षमता भाषेचा अभ्यास, विश्लेषण आणि संशोधन क्षेत्रात मोलाचा हातभार देऊ शकते.

हे सर्व काम मुक्तस्रोत आणि स्वयंसेवी स्वरूपाचे आहे. आंतरजालावर मराठीभाषेच्या वापराकरिता सुलभ मोफत तंत्रज्ञान व या तंत्रज्ञानासंदर्भात मदत करण्यास पुरेसे तज्ज्ञ आंतरजालावर उपलब्ध आहेत.

'मराठी विक्शनरी'च्या संदर्भात महाराष्ट्रातील विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्था विभागप्रमुखांना खालील स्वरूपाची मदत करण्याचे आवाहन आहे:-

  • मराठी विक्शनरीत मराठी व्याकरण, शब्दकोश यात भर घालण्याचे, निम्नलिखित कार्यात सहभाग घेण्यासाठी मराठीचे प्राध्यापक, शिक्षकवृंद, अभ्यासक आणि विद्यार्थी यांना विनंती करणे.
  • मराठी विक्शनरीत मराठी शब्दांचे आणि वाक्यांचे शक्य तेवढे विस्तृत वर्गीकरण करणे.
  • मराठी विक्शनरीत मराठी शब्दांचे उच्चारण व आंतरराष्ट्रीय उच्चारण पद्धती (आय. पी. ए.) तसेच विविध लिप्यंतरणपद्धती यासंदर्भात अभ्यासपूर्ण पाठबळ पुरवणे.
  • मराठी विक्शनरीत मराठी उच्चारणांच्या ऑडिओ फाइल्स बनवून आंतरजालावर उपलब्ध करणे.
  • मराठी विक्शनरीत विविध विषयांसंदर्भात विकिपीडियाच्या मराठी भाषांतरकारांना पारिभाषिक शब्दांसंदर्भात पाठबळ पुरवणे.
  • हिंदी व इंग्रजी भाषेतील विक्शनरी मध्ये पर्यायी मराठी शब्दांची भर घालणे.
  • हिंदी आणि इतर भारतीय भाषांतील विक्शनर्‍यांमध्ये मराठीतसुद्धा वापरल्या जाणार्‍या समानार्थी, समानोच्चारी शब्दांचे वर्गीकरण करणे.
  • संस्थेशी संलग्न संगणक विभागातील संगणक तज्ज्ञ अभियंते (खास करून नेटवर्क इंजिनिअर्स) यांचे इंटरनेटवर युनिकोड देवनागरी या अत्याधुनिक संगणक माध्यमाच्या मराठी वाचन आणि लेखनातील वापरासंदर्भात कार्यशाळा घेऊन त्यांच्या मदतीने इतर मराठी भाषकांकरिता कार्यशाळा घेणे.

"आपणासी जे जे ठावें, ते दुसर्‍यांसी सांगावे। शहाणे करुनी सोडावे, सकलजन॥" हे 'मराठी विकिपीडिया'चे ब्रीदवाक्य आहे. सर्व मराठी लोकांना आवाहन आहे की आपणास अवगत असलेल्या ज्ञानाचा लाभ स्वयंसेवी सहकारी पद्धतीने विक्शनरी आणि विकिपीडिया वापरून करून द्यावा आणि मराठी भाषेवरचे प्रेम कृतीतून व्यक्त करण्याची संधी साधावी.

'मराठी विकिपीडिया'वर मराठी विकिकर आपणा सर्वांची आतुरतेने प्रतीक्षा करीत आहेत.

– समस्त मराठी विकिकर

तळटीप:

या पत्रासंबंधित आंतरजालीय मराठी-इंग्रजी संज्ञा

  • आंतरजाल - internet
  • संकेतस्थळ - website or web-portal
  • मुक्त - open and free
  • मुक्तस्रोत - open source
  • विश्वकोश/ज्ञानकोश - encyclopedia
  • प्रणाली - software
  • वर्गीकरण - categorisation
  • संगणक - computer

या पत्राशी संबंधित आंतरजालीय संकेतस्थळे