विक्शनरी:धूळपाटी कितवा

`कितवा'चा भाषावैज्ञानिक उलगडा१

संपादन

(ह्या विभागातील लेखन अंशतः अथवा संपूर्ण "चिन्मय विजय धारूरकर" यांच्या संमतीने त्यांच्या आंतरजालावरील लेखातून घेण्यात आले आहे.)

`कितवा' हा शब्द आपण मराठीत जरी सर्रासपणे वापरत असलो तरी अन्य कित्येक भाषांमध्ये या प्रश्नार्थक-सर्वनामासाठी पर्यायी शब्दच सापडत नाही.हिन्दी,इंग्रजी,अरबी अशी भाषांची यादीच बनवता येईल ज्यांत `कितवा'ला पर्याय सापडत नाही.मराठीत `कितवा' जसा आहे तसा गुजरातीत केटलामो,कन्नड मध्ये एष्टनेय,तेलुगूत एन्नोवं,फ़ारसीत चॅन्दोम,जर्मनमध्ये वी फ़िल्टं इ. भाषांत चपखल पर्याय सापडतात.संस्कृतात `कतम' हा शब्द कितवाचा पर्याय म्हणून लोकप्रिय असला तरी त्यासाठीचा चपखल शब्द `कतम' नसून `कतिथ' आहे - हे साधार स्पष्ट करणे हा या शोधनिबन्धाचा एक हेतू. बरेच कोशकार `कतिथ' या शब्दिमासाठी इंग्रजीत `हाउमेनिअथ'/`हाउमेनिअस्ट'(मोनिअर-विलिअम्स,२००३/१८९९:२४६) असा कृतक शब्द निर्माण करतात.त्याप्रमाणे हिन्दीसाठीही कोशकार `कितनवा'(सूर्यकान्त,१९८१) अशी शब्दनिर्मिती करतात.या निबंधात या गोष्टीचाही शोध घेण्यात आला आहे की इंग्रजीतील fourth, fifth, sixth यातील `-th' हा प्रत्यय व संस्कृतातील चतुर्थ, षष्ठ, कतिथ व कतिपयथ यातील `थुक्'(पाणिनीय संज्ञेनुसार)प्रत्यय म्हणजेच `थ' हे सजातीय (cognate) आहेत काय? `कितवा' या अर्थी `कतम' कसा चपखल पर्याय नसून कतिथ कसा चपखल आहे ते पाहू.थोडीशी सूक्ष्मेक्षिका हे समजून घेण्यासाठी पुरेशी आहे.संस्कृतात `कितवा' या अर्थी नेहमीच `कतिथ' हाच शब्द वापरात होता व `कतम'चा अर्थ सर्वत्र `अनेकातील कोणता अथवा कोण' असाच दृष्टीस पडतो.हे आपण साधार स्पष्ट कसे होते ते पाहूच पण त्यापूर्वी `कतम' व `कतिथ' वरची पाणिनीय सूत्रे२ कोणती ते पाहून ठेवू.`कतम' मध्ये `डतमच्' प्रत्यय असल्याचे पाणिनी या सूत्रात सांगतो-

१.(अ)`वा बहूनां जातिपरिप्रश्ने३ डतमच्' (५.३.९३) या आधीचे सूत्र आहेः (आ)`किंयत्तदोर्निर्धारणे द्वयोरेकस्य डतरच्'(५.३.९२) (अ) नुसार परिप्रश्न हा किम् च्या बाबतीत संभवतो.यद्,तद् प्रश्नार्थक नसल्याने परिप्रश्न त्यांच्याबाबतीत असूच शकत नाही.जातिग्रहण मात्र होऊ शकते.`वा' ने `यकः', `सकः' या रूपांचा विकल्प स्पष्ट होतो.या सूत्राने `कतम',`यतम' व `ततम' असे तीन शब्द सिद्ध होतात.हेच जातिग्रहण अथवा परिप्रश्न दोन गोष्टींमधील असल्यास `डतरच्' प्रत्यय होऊन `कतर',`यतर' व `ततर' अशी प्रातिपदिके तयार होतात. (२)षट्कतिकतिपयचतुरां थुक् (५.२.९१)

तस्य पूरणे डट् (५.२.२८) या सूत्राने क्रमवाचकांसाठी `डट्' हा प्रत्यय होतो व त्याला होणारे विकल्प,आगम नंतरच्या सूत्रांत सांगितले आहेत.`थुक्' हाही `डट्' चा आगमच आहे.जो षष्ठ,चतुर्थ,कतिथ व कतिपयथ या ठिकाणी होतो.मडागम,तमडागम असे अन्य आगमही प्रथम,नवम,सप्तम तसेच षष्टितम(साठावे),सप्ततितम(सत्तरावे) यांत दिसून येतात.
ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की कतममधला `तम' हा क्रमवाचकातला तमडागम नसून `डतमच्'मधला आहे.ते दोन भिन्न प्रत्यय आहेत जे भिन्न प्रकृतींना लागतात.यावरून ही गोष्ट तर स्पष्ट होतेच की `कतम'चा अर्थ `कितवा' मुळीच नाही आणि `कतिथ'चाच अर्थ केवळ कितवा होतो.`कतम'चा अर्थ केवळ `अनेकातील कोणता किंवा कोण' एवढाच होतो. म्हणजेच `कतम'मध्ये `क्रमातील कोणता' असा अर्थ नाही कारण त्यात क्रमवाचक किंवा पूरणार्थक प्रत्ययच नाही म्हणून `कोणता'(जो जातिपरिप्रश्नाचा आहे)हाच अर्थ निघतो.`कतिथ' मध्ये मात्र `क्रमातील कोणता' म्हणजेच `कितवा' असा अर्थ स्पष्ट होतो.अन्य शब्दात सांगायचे तर `कोणता'हे ढोबळमानाने एक मोठे आशयक्षेत्र व्यापते तर `कितवा' हे त्यातील एक विशिष्ट अर्थक्षेत्र दर्शविते.म्हणजेच `कितव्या'ची सारी उत्तरे ही `कोणत्या'ची उत्तरे असतीलच परंतु `कोणत्या'ची सारी उत्तरे `कितव्या'ला चालणार नाहीत.त्याचे उत्तर क्रमवाचकातच हवे.उदा.`कोणता मुलगा?' याला `उंच मुलगा' किंवा `पहिला मुलगा' ही दोन्ही उत्तरे चालतीलच परंतु `कितवा मुलगा'? याला `उंच मुलगा' हे उत्तर चालणार नाही `पहिला'हेच उत्तर लागेल.`कोणता' किंवा `कतम' मध्ये केवळ परिप्रश्नच नाही तर जातीसुद्धा अंतर्भूत आहे.[जात्या क्रियया गुणेन संज्ञया वा समुदायादेकदेशस्य पृथक्करणं निर्धारण इति काशिका(५.३.९२)]समुदायातील निर्धारण क्रमवाचक वापरून करणे कठीण,कारण विखुरलेल्या गोष्टींसाठी-समुदायासाठी कतम वापरणे जास्ती सयुक्तिक आहे.पूरणार्थ गुणात बसविण्याचा आग्रह आपण करू शकतो पण तो गुण विशेष्याचा अंगभूत न होता संख्यासापेक्ष गुण होईल.म्हणूनही मानवी मनाला क्रमवाचकांचा बोध विशेषणांसारखा होत असला तरी त्यांचा परिप्रश्न हा भिन्नप्रकारे होत आहे हे लक्षणीय व विचार करण्यासारखे आहे.कदाचित मानवाच्या उत्क्रांतीत संख्यांचा शोध हा फार अलिकडचा असल्यामुळे त्यांना विशेषणे या त्याच्या जुन्या आकलनाच्या चौकटीत बसवणे अप्रशस्त वाटले असावे म्हणूनही `कितवा' व `कोणता' ही भिन्न प्रश्नार्थक सर्वनामे दिसतात.म्हणजेच `कोणता' हे ढोबळ व `कितवा' हे विशिष्ट असेच आपल्याला म्हणायचे नाहीये तर `कोणता'चे जे उत्तर असेल ते विशेष्यास गुणाने,क्रियेने पृथक करणारे असेल.परंतु संख्या हेच मुळात अमूर्तीकरण(abstraction)असल्याने ते विशेष्याचे अंगभूत विशेषण होणेच शक्य नाही,तो निर्देश नेहमी सापेक्षच राहणार.उदा.पाचवा म्हणताच सहाव्याच्या आधीचा,तीन नंतर द्वितीय स्थानावर इ. सापेक्षता त्यात येते.परंतु लठ्ठ म्हंटल्यावर लठ्ठपणा हा अंगभूत गुणच व्यक्त होतो तसा पाचवा हा अंगभूत गुण नाही.
उपरोक्त चर्चेत कतम-कतिथ अर्थदृष्ट्या कसे वेगळे आहेत हे पाणिनीय सूत्रांच्या आधारे पाहिले.जिज्ञासू वाचकांसाठी क्रमवाचकांवरील अन्य पाणिनी सूत्रांचा निर्देश व उल्लेख करून ठेवत आहे.इथवर वापरलेली सूत्रे-

१.तस्य पूरणे डट् ( ५.२.४८) २.नान्तादसंख्यादेर्मट (५.२.४९)

  • ३.थट् च छन्दसि (५.२.५०)

४.षट-कति-कतिपय-चतुरां थुक् (५.२.५१)

  • ५.द्वेस्तीयः(५.२.५४)
  • ६.त्रेः सम्प्रसारणं च (५.२.५४)
  • ७.विंशत्यादिभिस्तमडन्यतरस्याम् ( ५.२.५६)
  • ८.नित्यं शतादि-मासार्ध-मास-संवत्सराच्च (५.२.५७)
  • ९.षष्ट्यादेश्चासंख्यादेः (५.२.५८)

(तारांकित सूत्रे लेखात पुढे वापरली जाणार आहेत किंवा केवळ निगडित आहेत.इथवर त्यांची चर्चा झालेली नाही.) कतम-कतिथ अर्थभेदावर चर्चा पाणिनीय सूत्रांच्या आधारे आपण केली. परंतु प्रत्यक्ष साहित्यातील उदाहरणेही हा भेद स्पष्ट करणारीच आहेत.यासाठी डेक्कन कॉलेज संस्कृत शब्दकोष प्रकल्पाच्या स्क्रिप्टोरियममधून कतम-कतिथ साहित्यात कुठे-कुठे आढळतात ते नोंदवून त्यांचे त्या-त्या संदर्भात अर्थ कसे आहेत हे पाहिल्यावर पुन्हा हेच सिद्ध होते की संस्कृतसाहित्यात सर्वकाळात हे दोन शब्दीम स्वतंत्र अर्थाने वापरात होते व त्यांची सरमिसळ कोठेही झालेली नाही. कतम-कतिथ आढळ,मूळ संहिता व अनुवाद-

कतम - १.ऋग्वेद-१.३५.७ ऋषी-हिरण्यस्तूप,आङ्गिरस; देवता-अग्नी,सविता; छन्द-त्रिष्टुभ् वि सुपर्णो अन्तरिक्षाण्यख्यद्गभीरवेपा असुरः सुनीथः| क्वे३दानीं सूर्यः कश्चिकेत कतमां द्यां रश्मिरस्या ततान || [अन्वय-असुरः गभीरवेपाः सुनीथः सुपर्णः अन्तरिक्षाणि व्यख्यत्,इदानीं क्व कतमां द्याम् अस्य रश्मिः आततान कः चिकेत ?] अर्थ-प्राण धारण करणारा,सूक्ष्म/गंभीर(दुर्ज्ञेय) कंपने असणारा,उत्तम प्रकारे पदार्थ मिळवून देणारा,चांगली पाने (किरणे) असणारा आता कुठे आहे(तो सूर्य)? ह्याच्या रश्मी कोणत्या दिशेला पसरलेल्या आहेत,कोण जाणतो? २.ऋग्वेद-२.२४.१ ऋषी-शुनःशेप आजीगर्ती देवता-प्रजापती छन्द-त्रिष्टुभ् कस्य नूनं कतमस्यामृतानां मनामहे चारू देवस्य नाम| को नो मह्या अदितये पुनर्दात्पितरं च दृशेयं मातरं च|| अर्थ-कोणत्या देवास आम्ही अमृताचा (द्योतक)मानावे? जो आम्हास पोषणकर्ती पृथ्वी देतो व पुन्हा आईवडीलही? ३.छान्दोग्योपनिषद्-१.१.४ कतमा कतमर्क्कतमत्कतमत्साम कतमः| कतम उद्गीथ इति विमृष्टं भवति || अर्थ-ऋचा कोणती आहे,साम कोणते आहे,कोणता उद्गीथ आहे असा प्रश्न आहे (किंवा याचा विचार केला जातो). (उपनिषद्-वाङ्मयात `कतम' एकूण वीस वेळा). ४.महाभारत४ महाभारतात `कतम' चौदावेळा आढळून येतो. १)१.८८.९c विद्यात् अलक्ष्मीः कतमं जनानाम् २)१.२२४.२२a ज्येष्ठः सुतस्ते कतमः ३)१.२२४.२२c मध्यमः कतमः पुत्रः ४)३.१२३.१२a ततस्तस्यावयोश्चैव ५)४.४०.१c कतमं यास्येsनीकं ६)४.४५.९a कतमद् द्वैरथं युद्धम् ७)४.४५.११a तथैव कतमं युद्धम् ८)४.५०.३c कतमं यास्येsनीकं ९)५.३६.८c विद्यात् अलक्ष्मीः कतमं जनानाम् १०)५.४३.२४c तेषां तु कतमः स स्याद् ११)५.१०१.२०a कः पिता जननी चास्य १२)१२.२६२.३२a एतेषां प्रेत्यभावे तु कतमः १३)१२.२६३.५a ततश्चिन्तां पुनः प्राप्तः कतमद् १४)१२.३१९.१९a दैवतं कतमं ह्येतद् या सर्वठिकाणी `कतम'चा अर्थ `कितवा' नसून `कोणता' असाच आहे.वानगीदाखल २),३) सविस्तर उद्धृत करत आहेः आदिपर्वातील या श्लोकात मन्दपाल जरितेला प्रश्न विचारत आहे. २)१.२२४.२२a ज्येष्ठः सुतस्ते कतमः कतमस्तदनन्तरः| मध्यमः कतमः पुत्रः कनिष्ठः कतमश्च ते || अर्थ- तुझा थोरला मुलगा कोणता आहे?त्यानंतरचा कोणता आहे?मधला मुलगा कोणता आहे?आणि सर्वात धाकटा मुलगा कोणता आहे? वरील ४)३.१२३.१२a `ततस्तस्यावयोश्चैव' वैशिष्ट्यपूर्ण आहे.त्यात `कतम' नसून `एकतम' असा प्रयोग आहे.आरण्यक पर्वातील हा श्लोक(आश्विनौ)आश्विनांच्या मुखी आहे व ते वनात एकाकी दिसलेल्या च्यवनाच्या बायकोला उद्देशून म्हणत आहेत-

ततस्तस्यावयोश्चैव पतिमेकतमं वृणु| एतेन समयेनैनमान्त्रय वरानने || "आवयोश्चैव पतिमेकतमं वृणु"-आमच्यातील एकाची पती म्हणून निवड कर.इथे `एकतमम्'साठी `एकतरम्',`अन्यतमम्' असे पाठभेद आहेत.हे वैशिष्ट्यपूर्ण आहे.(या वरील चर्चा निबंधाच्या शेवटाला). ५.विक्रमोर्वशीय- `अपि ज्ञायते कतमेन दिग्भागेन गतः स जाल्मः'(अंक पहिला,राजा मेनकेस) मेनका, राजास उर्वशीला कोण्या दानवाने नेले ते सांगते.त्यावर राजा उपरोक्त प्रश्न करतो.- `तो हलकट कोणत्या दिशेने गेला?'

६.अभिज्ञानशाकुन्तल- (१)अथ कतमं ऋतुमधिकृत्य गास्यामि|(अंक १,नटीच्या मुखी,श्लोक ३ पूर्वी) `आता कोणत्या ऋतुवरील गाणे गाऊ'? (२)तदिदानीं कतमत्प्रकरणमाश्रित्यैनमाराधयाम:| (अंक १,सूत्रधाराच्या मुखी,श्लोक ४ नंतर) `तर आता कोणते प्रकरण(नाटक)सादर करून यांचे मनोरंजन करत आहोत?' याशिवाय मध्ययुगीन संस्कृतात कतम बहुत्र सापडतो.वानगीदाखल एवढे पुरे.`कतम'च्या अन्य अर्थछटांसाठी जिज्ञासू वाचकांनी मोनिअर-विलिअम्स अथवा वा.शि.आपटे यांचे संस्कृत-इंग्रजी कोश पहावेत.

कतिथ- १.ऋग्वेद-१०.६१.१८ ऋषी-नाभा-नेदिष्ठ मानव देवता-विश्वदेव छन्द-त्रिष्टुभ तद्बन्धुः सुरिर्दिवि ते धियंधा नाभानेदिष्ठो रपति प्र वेनन्| सा नो नाभिः परमास्य वा घाहं तत्पश्चा कतिथश्चिदास|| अर्थ-(मी)ईश्वर हाच बन्धू असणारा,प्रेम करणारा,नाभानेदिष्ठ हे सुर् व दिव् उभयत्र धी(बुद्धी)दात्या तुझी स्तुती करतो.ईश्वराची ती परम वाणी आपली मैत्रीण/केंद्र/जवळची नातलग आहे.त्याच्या उपासकांपैकी मी कितवा बरं असेन?

२.महापुराण-१.१.७५(भगवत् जिनसेनाचार्यांचे संस्कृत महापुराण) युगस्य कतिथे भागे मनवो मन्वते च किम्| किं वा मन्वन्तरं देव तत्त्वं मे ब्रूहि तत्त्वतः|| अर्थ-युगाच्या कितव्या भागात लोक काय मानत होते/विचार करत होते? किंवा अन्य कोणता संप्रदाय होता(मन्वंतर),ते हे देव (आचार्य) (आपण)तत्त्वतः मला सांगा. (प्रस्तुत श्लोक अशा अनेक श्लोकांपैकी आहे ज्यांत शिष्य आचार्यांना अनेक प्रश्न विचारत आहे.)

३.समरादित्यसंक्षेप-५.८४०a(जैन चम्पू इ.स्.१२६८) कालेन कतिथेनापि पित्रोः पञ्चत्वमीयुषोः| श्रीकान्तिनिलयाभिख्यं राज्ये न्यास्थं निजानुम्|| अर्थ-वडील दिवंगत झाल्यानंतर कितव्यातरी वर्षी श्रीकान्तिनिलय नावाच्या आपल्या धाकट्या भावाला गादीवर बसविले.

४.द्व्याश्रयमहआकाव्य १८.५३-५४(इ.स.११००-११७३) गणतिथैरिह सङ्घतिथा भटैरमरपूगतिथत्वमयुर्हताः| विरहितेयतिथैः कतिथैश्चमूरिति न किञ्चिदबुध्यत तत्र तु|| (पहिल्या चरणातील कल्पना अशी आहे की रणांगणात स्वपक्षातील भटांनी विरुद्ध सेनेतील अनेक सैनिकांना ठार केले.तेच "गणतिथैरिह सङ्घतिथाः हताः" मधून सांगितले आहे.द्वितीय चरणात अशी शंका उपस्थित केली आहे की-`स्वपक्षातील नेमक्या कितव्या भटांनी विरोधीसैन्यातील चमू नष्ट केला'व त्याचे उत्तरही त्यातच `हे काही समजले नाही'असे दिले आहे.स्वपक्षातील भटांचा पराक्रम अशा वेगळ्या पद्धतीने सांगितला आहे.) अर्थ-गणात बसतील(असतात)तेवढ्या (स्वपक्षातील)भटांनी संघात असतात(मावतात)तेवढ्या (विरुद्ध सेनेतील सैनिकांना)मारले.व मारले गेलेले अमरपूगतिथत्वास(देवत्वास)गेले.इतकाव्यांनी की कितव्यांनी विरोधी चमू ठार केला ते काही समजू शकले नाही.(सैन्य मोठे असल्यामुळे)

बलकतिपयथः कोsपि दोर्द्वितीयस्तूणतृतीयः सद्धनुश्चतुर्थः| षष्ठं तुर्यं विद्विषं नृपास्य घ्नंश्चक्रे भर्त्रात्मनस्तुरीयः|| ( या श्लोकात स्वपक्षातील राजाने एका भटास स्वतःपासून चौथ्या स्थानी आणवले हे सांगितले आहे.अर्थातच तो भट पराक्रमी कसा होता हे श्लोकातील अन्य विशेषणांवरून स्पष्ट आहे.यातील `कतिपयथ'चा वापर लक्षणीय आहे.) अर्थ- बळाने अनेकांचे पूरण असणा-या (अनेकांचे/कितीतरी जणांचे बळ स्वतःच्या ठिकाणी असणा-या)कोण्या - बाहू हेच द्वितीय असणा-या आणि धनुष्य चौथा असणा-या व ज्याने शत्रुराजाच्या सहाव्या व चौथ्या(तुर्य)सैनिकांना ठार केले आहे (करणा-या)अशा - भटास राजाने (त्या भटाच्या अशा सम्माननीय कामगिरीबद्द्ल)स्वतःपासून चौथ्या स्थानी नेमले.

५.शिशुपालवध-१५.४२c विहितागसो मुहुरलङ्घ्यनिजवचनदामसंयतः| तस्य कतिथ इत तत्प्रथमं मनसा समाख्यदपराधमच्युतः|| अर्थ-शात्वती नावाच्या आपल्या आत्याला म्हणजेच शिशुपालाच्या आईला-शिशुपालाचे शंभर गुन्हे सहन करण्याच्या दिलेल्या स्वतःच्याच वचनाने बांधील श्रीकृष्ण (शिशुपालाने आधी हजार गुन्हे केलेले असूनसुद्धा इथे केल्या जाणा-या गुन्ह्यांना)त्याचा पहिला मानून `हा कितवा' म्हणून मनातल्या मनात मोजू लागला. प्रस्तुत कतम-कतिथ च्या संदर्भांवरून खालील गोष्टी स्पष्ट आहेतः (१)`कतम' सर्वकाळात (वैदिक संस्कृतात,उपनिषद्वाङ्मयात,महाभारत व मध्ययुगीन संस्कृतात सर्वत्र)`कोणता'याच अर्थाने प्रयुक्त. (२)`कतिथ' वैदिकोत्तरही सर्वकाळात उपलब्ध हे महापुराण,समरादित्यसंक्षेप व शिशुपालवध यातील आढळांवरून सिद्ध. (३)अतः `कतम' व `कतिथ' यातील अर्थ व प्रयोग दृष्ट्या वेगळेपण स्पष्ट. `डट्'हा प्रत्यय खरा मूळचा क्रमावाचक/पूरणार्थक प्रत्यय. अन्य त्याचे आगम(शिवाय ५.२.५४ व ५५ मधील `तीय' प्रत्यय हा `डट्'चा अपवाद आहे).ते आगम म्हणजे मडागम (जो सप्तम,नवम इ.त दिसतो),थुगागम(जो चतुर्थ,षष्ठ इ.त आहे) व तमडागम (जो वीसनंतर विकल्पाने होतो म्हणजे विंशः व विंशतितमः अशी वैकल्पिक रूपे मिळतात तर साठपासून पुढे निर्विकल्प तमडागम होतो). आता इतक्या मोठ्या प्रमाणात `तम' येत आहे म्हणजे `तम'ची रूपतालिका(paradigm)देखील मोठी आहे.तर प्रश्नार्थकातही `कतम' असावयास हवे होते असे असता `थ'चा गण/रूपतालिका(paradigm)फारच मोजका-दोन क्रमवाचकांपुरताच(चतुर्थ व षष्ठ)आहे तरीही `कतिथ' हाच `कितवा'या अर्थी असे का५? याचे फारसे नाही पण ब-यापैकी समाधानकारक उत्तर असे की ५.२.५१ ज्यात थुगागम सांगितलेला आहे त्याच्या आधीच्या `थट् च छन्दसि'(५.२.५०)या सूत्राने वेदात नान्त संख्यांना `थडागम' होतो.म्हणून `पञ्चथ',`सप्तथ' अशी रूपे आढळतात.या सूत्राने `थ' च्या रूपतालिकेत थोडी (का होईना!) वाढ झाली.आता शक्यता नाकारता येत नाही की पूर्वी सर्वत्रच `थ' असावा जसा आज इंग्रजीत फोर्थ(fourth)पासून पुढे सर्वत्र `-th' प्रत्ययच दिसतो.

आता आपण निबन्धाच्या दुस-या मुद्याकडे वळू की इंग्रजीतला `-th' प्रत्यय व संस्कृतातील थुगागम हे सजातीय होत काय?
या प्रश्नाकडे वळण्यापूर्वी आपण एक निरीक्षण नोंदवून ठेवू.ते असे की संस्कृतात क्रमवाचक `तम'(तमडागम)दिसतो तसेच जातिपरिप्रश्नातील `तम'(डतमच्-प्रत्यय)सुद्धा दिसतो आणि `आतिशायने तमबिष्ठनौ'( ५.३.५५)या सूत्रानुसार तमभाववाचक -`तम'म्हणजेच `तमप्'प्रत्ययही दिसतो.अशा तीन-

१.क्रमवाचक(`डट्'चा तमडागम) २.तमभाववाचक(`तमप्'प्रत्यय जो उत्तम,सुन्दरतम,प्रियतम इ.त दिसतो)व ३.जतिपरिप्रश्नातील(`डतमच्' जो कतम मध्ये दिसतो). `तम'प्रत्ययांची आपण पुढे सविस्तर चर्चा करणारच आहोत इथे केवळ उल्लेख करून ठेवत आहे. इंग्रजीतल्या -th प्रत्ययाची व्युत्पत्ती `ऑक्सफर्ड इंग्रजी व्युत्पत्तिकोश६'(Oxford Etymology Dictionary)सांगतो- "The suffix -th in English had variations -th,-t,-d that represent an original IE -tos (cf.Latin -quintus),understood to be identical with one of the superlative degree" ["मूळ युभा(युरोभारतीय-IE)-tos(लॅटिन -quintus शी तुल्य)चे प्रतिनिधित्व करणा-या इंग्रजी -th प्रत्ययाची -th,-t,-d अशी विविध रूपे होती व तो प्रत्यय तमभाववाचक प्रत्ययांमधील एकाशी सारखेपणा(साधर्म्य,साम्य) असणारा समजला जातो".]

यावरून ही गोष्ट स्पष्ट झाली की Old English मध्ये (संस्कृतप्रमाणेच) तमभाववाचक `तम' व क्रमवाचक `तम' सारखेच होते.उच्चारणात सारखे असणे म्हणजे आशयातही सारखे असणे जरूरीचे नसले तरी येथे आपल्याला क्रमभाव व तमभाव यातील साम्यभेदावर विचार करण्यास चालना मिळत आहे.वरील OED च्या नोंदीनुसार IE-tos प्रत्यय आहे व तोही तमभाववाचक प्रत्ययांमधील एकाशी साम्य असणारा आहे.आपणास मूळ IE-प्रत्यय सापडला आहे म्हणून संस्कृतातील `थुक्' व इंग्रजीतील -th प्रत्यय हे सजातीय(cognate)आहेत हे स्पष्टच होत आहे.
इथे आपल्याला `th' व `थुक्' दोन्हीत `थ्' हाच स्वनीम आहे याच्याशी तितकसे घेणे नाही.परंतु त्याचे तमभाव व क्रमभाव व्यक्त करतानाचे कार्य याच्याशी आपल्याला कर्तव्य आहे.संस्कृतातील तमभाववाचक `तम' व क्रमवाचक `तम' याचा आपण मागे उल्लेख केला.त्यावर आता चर्चा करू.`तम'(दोन्ही तमवाचक व क्रमवाचक) हा प्रत्यय,तो ज्या प्रकृतींना लागतो त्या प्रकृती व तयार झालेले शब्द यातील साम्यावरील मुद्दे असे -

(१) स्वनसादृश्य(phonetic similarity): `तम' हा प्रत्यय उच्चारणात सारखा आहे. (२) तो ज्या प्रकृतींना लागतो त्या दोन्ही विशेषणे होत आणि संस्कृतात तर चत्वारि(चार)पर्यंत संख्या नामानुसार बदलतात.(त्यामुळे संख्या याही विशेषणेच होत हे संस्कृत जाणणा-यांसाठी नवल नाही!) (३) दोन्ही तयार झालेले शब्द तमवाचक (उत्तम,सुन्दरतम इ.) व क्रमवाचक(पाचवा इ.) हे विशेष्याचे विशिष्टतावाचक विशेषण आहेत.एरव्ही विशेषण व्यावर्तन(isolation)घडवून आणते.(व्यावर्तकं विशेषणम्|)पण क्रमवाचक व तमवाचक विशेष्याची विशिष्टता(specificity७)व्यक्त करतात म्हणून तर इंग्रजीत superlative(तमवाचक रूपे) व ordinal numbers(क्रमवाचक रूपे) यापूर्वी हमखास `the' वापरण्याची पद्धत आहे.(परंतु `He stood first in the class' यातील `first' हे adverb of position(स्थलवाचक क्रियाविशेषण)आहे व a fastest इ. प्रयोगात `a' हा `one of the fastest' सांगणारा आहे हे सर्वज्ञातच आहे!) आता फरक पाहू- (१) क्रमवाचक `तम' हा केवळ जागा दाखवतो,[जी अमुक संख्या एखाद्या गोष्टीने व्यापली(ज्याला पाणिनी `पूरण'८ म्हणत आहे)-असेल]फक्त क्रमांक सांगतो,विशेष्याचा अंगभूत गुण नाही.तर तमवाचक -`तम' अंगभूत गुणाचे `आतिशायत्व',`प्रकर्ष' सांगतो. याचाच अर्थ असा की क्रमवाचके ही दर्शक-सर्वनामांसारखी (demonstrative pronouns)किंवा उपपदांसारखी(articles) आहेत,जी पुन्हा विशेषणांप्रमाणेच चालतात.(उद.`तद्'सर्वनाम तिन्ही लिंगात चालते,तर फ्रेंच,जर्मन मध्ये articles ही नामानुसार चालतात.) (२)वरील फरक अन्यशब्दात असा सांगता येईल की जेव्हा आपण क्रमवाचक वापरतो तेव्हा आपल्याला अन्य गणनसंख्यांची (counting numbers) किंवा अपूर्णांकांची (fractions) आकांक्षा असते ज्यातील अमुक एक क्रमवाचकात निर्दिष्ट असतो. तर तमवाचकात किमान तीन समानगुणी विशेष्यांची आकांक्षा असते ज्यातील एकात गुणाचा प्रकर्ष तमवाचकातून सांगितलेला असतो. म्हणजेच 'विशिष्टता' हा समान गुण असला तरी गुणातील (गुणाच्या प्रकर्षातून व्यक्त होणारी) विशिष्टता व क्रमस्थानातील विशिष्टता, या दोन भिन्न विशिष्टता होत.पहिली गुणातील विशिष्टता अंगभूत तर क्रमस्थानातील विशिष्टता सापेक्ष असा या दोन विशिष्टतांमधील फरक.

पाणिनी तमवाचक प्रत्ययास `तमप्' व क्रमवाचक प्रत्यय- डट्,त्याच्या एका आगमास तमट्-आगम असे नाव देतो.ही वेगवेगळी नावे त्यांच्या वेगवेगळ्या कार्यामुळेच (अनुक्रमे प्रकर्षदर्शकत्व व क्रमवाचकत्व).आता आपण थोडी चर्चा तमभाववाचकत्व व तरभाववाचकत्व यावर करूया व थांबूया-

वस्तुतः तमभाववाचकत्व व तरभाववाचकत्व यात तुल्य विशेष्यांची संख्या सोडता तसा काहीच फरक नाही.कारण उभयही अनेकातील (दोन किंवा अधिकातील)गुणप्रकर्ष ज्यात आहे त्याची विशिष्टता व्यक्त करतात.आपले "तमभाववाचकत्व व तरभाववाचकत्व यात तुल्य विशेष्यांची संख्या सोडता तसा काहीच फरक नाही" हे विधान पडताळण्यासाठी अशी भाषा शोधावी लागेल जिच्यात तर-तम-भाव-वाचक रूपांत काही फरक नाही.[(जसा फरक संस्कृतात `सुन्दरतर'व `सुन्दरतम' यात मूळ विशेषण `सुन्दर' यास `तर' व `तम' प्रत्यय लागून वेगळे शब्द साधले गेले(derive)व पुढे ते स्वतंत्रपणे चालतात म्हणजेच भिन्न(विभक्ती) विकारित रूपे (inflections)होतात]. एक गोष्ट स्पष्ट आहे की तरभाव व तमभाव `भाव'(notion)म्हणून सर्वच भाषांत सापडतील (त्यात नवल नाही), पण भिन्न शब्दसाधना(derivation)व विकार(inflection)सापडत नसेल तर त्यात आपल्याला रस आहे.म्हणजेच एकच रूप दोन किंवा अधिकातील प्रकर्ष व्यक्त करण्यासाठी,तसा (दोनात किंवा जास्तीत) उल्लेख करून,वापरले जात असेल.अशी भाषा अरबी असली[उदा.`अरुण अकबरु मिन निशिकांत'(अरुण निशिकांतपेक्षा मोठा आहे) यात `अकबरु' हे मूळधातू `कबुरs'(मोठे,महान,थोर असणे) यापासून मिळवले आहे.आधी गुणवाचक मोठा,महान या अर्थी `अकबर' हे रूप साधले जाते व दुस-या एकाशी तुलना करावयाची असल्याने `अकबरु मिन' अशी रचना होते.तेच तमवाचक म्हणावयाचे झाल्यास `अरुण अल्-अकबरs'(अरुण सगळ्यात मोठा आहे).यातही `र'चा `रु' हा `अल्'या उपपदामुळे होतो त्याचा तमवाचकतेशी काहीही सम्बन्ध नाही.]तरी इतक्या दूर जाण्याचे कारण नाही.मराठीतही तसंच आहे.(आणि खरं तर सर्वच आधुनिक भारतीय भाषात).म्हणजे अगदी पुस्तकी संस्कृत-प्रचूर मराठी सोडा पण एरव्ही बोलीत आपण कुठे तरभाव व तमभाव-वाचकरूपे वेगवेगळी वापरतो?`हा चांगला',`हा दोघात चांगला',`हा सगळ्यांत चांगला' अशीच तर रचना करतो.

वस्तुतः दोन मध्येही अन्-एकत्व आहेच.मग दोनसाठीच (तरभाववाचक रूपे-संस्कृत,फारसी,जर्मन इ. भाषात वेगवेगळी होतात) अशी भिन्न किंवा खास व्यवस्था का?
यावरून राजवाडेंच्या[शहा(सम्पा.)१९९५:४०]या मताला पुष्टी मिळत आहे की `दोन'चा शोध मानवाला अनेक (दोनहून अधिक) चा शोध लागण्याच्या फार पूर्वी लागला होता.आपण म्हणू की तरभाववाचक भिन्न रूपे ही त्याच द्विवचनाच्या पूर्वत्वाला९ अधोरेखित करणारी आहेत.
याच मुद्याशी निगडित `कतम' व `कतर' विषयीची महाभाष्यातील नोंद वैशिष्ट्यपूर्ण आहे.ज्यावरून आपण मागे उल्लेखलेल्या महाभारतातील `एकतर' व `एकतम'चीही संगती लागेल.महाभाष्यात `वा बहूनां..'( ५.३.९३) या सूत्रावरील भाष्यात (व त्यावरील `प्रदीप' या टीकेत व त्यावरील `उद्योत' या टीकेत `कतर'चा प्रयोग `अनेकातील कोणता' या अर्थी सापडत असल्याचे म्हंटले आहे.अर्थात हा अपाणिनीय किंवा पाणिनिपश्चात किंवा अप्रमाण प्रयोग असणार हे स्पष्टच आहे.टीकेत `बहुषु आसीनेषु कश्चित्कञ्चित् पृच्छति कतरो देवदत्तः' असा प्रयोग दिला आहे.थोडक्यात इथे `कतम'च्या अर्थाने `कतर' वापरले आहे.या प्रयोगाचे एक स्पष्टीकरण असे देता येईल की विचारणा-याच्या मनात दोन संच(sets)आहेत.एक संच अशा व्यक्तींचा जे देवदत्तेतर आहेत व दुसरा संच ज्यात एकच सदस्य-देवदत्त आहे व त्या दोहोत `कतरो देवदत्तः' हे सुसंगत वाटेल.किंवा दुसरे स्पष्टीकरण असे की विचारणा-याच्या मनात अनुक्रमरहित जोड्या (unordered pairs) आहेत ज्यांत एक देवदत्त आहे व दुसरा नाही म्हणजे (एतयोः अयं वा अयं वा)`या दोघांत हा की हा' अशी विचारणा केली जाते आहे.

शिवाय जिथे `डतरच्' हवा तिथे `डतमच्' प्रयोग आपल्या महाभारतातील `आवयोः एकतमं' या श्लोकात आपण पाहिलाच आहे.राजवड्यांच्या म्हणण्याचे औचित्य इथे असे लावता येईल की एकदा का अन्-एकत्वात द्वित्वसुद्धा अन्तर्भूत झाले की त्या-त्या रूपांचे (अनेकत्व,द्वित्ववाचक रूपांचे)विलोपन/अभेदन(merge)होणे स्वाभाविकच आहे.


टिपा- (१)हा शोधनिबंध `लिंग्विस्टिक सोसायटी अव्ह इंडिया'च्या ६-८ डिसें.२००५ ला `हैदराबाद केंद्रीय विद्यापीठ' येथे झालेल्या ७०व्या परिषदेत अतीव संक्षिप्त स्वरूपात `अ लिंग्विस्टिक स्टडी अव्ह हाउमेनिअथ' या शीर्षकाखाली सादर करण्यात आला होता.http://chinmaydharurkar.blogspot.com/ या पत्त्यावरही पाहता येईल. (२)येथील सूत्रचर्चेसाठी डॉ.शि.द.जोशी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.चुकांचे व त्रुटींचे स्वामित्व अर्थातच माझे आहे. (३)जातिपरिप्रश्न-याचा विग्रह `जातौ परिप्रश्न' असा आहे.`जातेः परिप्रश्नः'असा नाही असे छान्दोग्योपनिषदाच्या(`कतम'खाली उद्धृत)१.१.४ च्या शांकरभाष्यात स्पष्ट केले आहे.शंकराचार्य `कतमा ऋक्'च्या विवरणात `न हि अत्र ऋग्जातिबहुत्वम्'म्हणजेच इथे ऋग्जातीचे(ऋग्ता या अर्थी)बहुत्व नाही परंतु `ऋग्व्यक्तीनां बहुत्वोत्पत्तेः तु जातेः परिप्रश्नः इति विगृह्यते'म्हणजेच अनेक ऋचांतील बहुत्वामुळे `जातेः परिप्रश्नः'असा विग्रह केला जातो.

`जाति'मधून `पणा' या मराठी प्रत्ययातून जी विवक्षा असते ती निर्दिष्ट आहे.जेव्हा `कतम' अशी विचारणा होते तेव्हा जातीची विचारणा होत नसून एका जातीतील अनेक व्यक्तींमधील एका व्यक्तीविषयी प्रश्न केला जातो.उदा.एतेषु कतमस्ते पुत्रः?`यांतील तुझा मुलगा कोणता' येथे अनेक पुत्रव्यक्तींमध्ये (ज्या पुत्रत्व या एकाच जातीमध्ये मोडणा-या आहेत त्यांतील) एकाची चौकशी होत आहे.`पुत्रत्व' या जातीबद्द्ल परिप्रश्न केला जात नाहीये.

(४)महाभारतातील `कतम' नोंदीसाठी सौ.जाह्नवी बिदनूर(शिल्पा मुळे)व डॉ.जॉन स्मिथ यांचे साहाय्य लाभले आहे. (५)ही शंका व तिचे निरसन डॉ.कल्याण काळे यांच्याशी झालेल्या वैयक्तिक चर्चेवर अधारित आहे. (६)`ऑक्सफ़र्ड इटिमॉलॉजी डिक्शनरी'च्या इंटरनेट आवृत्तीमधील ही नोंद डॉ.जॉन स्मिथ यांच्याशी झालेल्या ई-मेल संपर्कातून मिळवली आहे.टीप १ मध्ये उक्त ब्लॉगपत्त्यावरही ही नोंद पाहता येईल. (७)डॉ.अशोक केळकर यांनी हा शब्द सुचविला आहे. (८)'पूरण' मधून केवळ क्रमवाचकताच अपेक्षित नाही तर अमुक गोष्टींना(जागेला,गुणाला,संख्येला,व्यक्तींना इ.)व्यापून राहण्याची विस्तृत कल्पना त्यात आहे.`तस्य पूरणे डट्'यातील पूरणाची ही व्याप्ती `षट्-कति-कतिपय-चतुरां थुक्'यातील `कतिपय'ला लागून बनणा-या `कतिपयथ'मधून स्पष्ट होते.`द्व्याश्रयमहाकाव्य'च्या उद्धृत ५४व्या श्लोकात `बलकतिपयथ' हा शब्द यामुळे लक्षणीय आहे.याचा अनुवादही आपण `बळाने अनेकांचे पूरण असणारा म्हणजेच कितीतरी जणांचे(अनेकांचे) बळ स्वतःच्याच ठिकाणी असणारा असा केला आहे. (९)आधुनिक युरोभारतीय भाषांत द्विवचने नाहीत.परंतु द्विवचनाच्या काही खुणा मात्र नक्कीच शिल्लक आहेत.व तरभाववाचक रूपे म्हणजेही अशीच एक(वा एकच?)खूण.PIE-प्रोटो युरोभारतीयच्या विकासांमध्ये-ग्रीक,संस्कृत, लॅटिन मध्ये द्विववचने व तरभाववाचक रूपे दोन्ही सापडतात,तज्जन्य काही आधुनिक भाषांत केवळ तरभाववाचक रूपे सापडतात.(उदा.इंग्रजी,जर्मन,डच इ).तर काहीत दोन्ही सापडत नाहीत.ना तरभाववाचक रूपे ना द्विववचने.(उदा.मराठी व अन्य भारतीय भाषा).वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी की हे आर्यभाषांतच दिसते.द्रविडकुटुंबात द्विवचनेही नाहीत व तरभाववाचकेही नाहीत.यात आश्चर्य नाही.पण सेमिटिक कुटुंबात(उदा.अरबी,हिब्रू इ.भाषांत) द्विवचने आजही आहेत परंतु तरभाववाचक रूपे पूर्वीपासूनच आढळत नाहीत.त्यामुळे द्विवचने व तरभाववाचक रूपे यात संबंध असला पाहिजे असा केवळ आपला कयास आहे.परंतु जगातील सर्व भाषा व भाषाकुटुंबे यांचे या संदर्भात चित्र नक्की कसे आहे हे जाणण्यासाठी इंटरनेटवरील `लिंग्विस्ट लिस्ट'(http://www.linguistlist.org/ask-ling/index.html) येथे विचारल्यावर तज्ज्ञ भाषावैज्ञानिकांनी जी माहिती ई-मेल द्वारा पुरवली व त्यांच्याशी जे ई-मेल सम्भाषण झाले ते टीप १ मध्ये नमूद केलेल्या ब्लॉग-पत्त्यावर उपलब्ध आहे.ते अर्थात इंग्रजीत आहे.

संदर्भ-

(अ)कोशसाहित्य- (१)आपटे,वा.शि.[१८९०(१९६५)]द प्रॅक्टिकल संस्कृत-इंग्लिश डिक्शनरी.मोतीलाल बनारसीदास,नवी दिल्ली. (२)डेक्कन कॉलेज स्क्रिप्टोरियम,संस्कृत शब्दकोश प्रकल्प,डेक्कन कॉलेज,पुणे. (३)मोनियर विलियम्स[१८९९(२००२)]अ संस्कृत-इंग्लिश डिक्शनरी.मोतीलाल बनारसीदास, नवी दिल्ली. (४)सूर्यकान्त(१९८१)अ प्रॅक्टिकल वैदिक डिक्शनरी.ऑक्सफ़र्ड युनिव्हर्सिटी प्रेस,नवी दिल्ली.

(आ) अन्य- (१)जोशी,भा.भि(सम्पा.)(१९९२)व्याकरणमहाभाष्य(कैय्यटप्रदीपटीका व नागेशभट्टकृत प्रदीपोद्यत टीकासहित ६ खण्ड).वज्रजीवन प्राच्यभारती ग्रन्थमाला-२३,चौखम्बा,दिल्ली. (२)मिश्र,नारायण(सम्पा.)(२००१)वामनजयादित्यकृत काशिका.काशी संस्कृत ग्रन्थमाला-३७,चौखम्बा,दिल्ली. (३)शहा.मु.ब.(सम्पा.)(१९९१) इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य,खण्ड तिसरा- संस्कृत भाषा व भाषाशास्त्रीय लेख.राजवाडे संशोधन मंडळ,धुळे.

(इ)कतम-कतिथ जेथून उद्धृत- (१)काळे,मो.रा.(सम्पा.)(१९६१) अभिज्ञानशाकुन्तल.मोतीलाल बनारसीदास,दिल्ली. (२)जैन,पन्नलाल(सम्पा.)(१९४४) महापुराण -खण्ड १ आदिपुराण भगवज्जिनसेनाचार्यकृत. भारतीय ज्ञानपीठ,काशी. (३)वेलणकर,ह.दा (सम्पा.)(१९६१)कलिदासकृत विक्रमोर्वशीय.साहित्य अकादमी,नवी दिल्ली. (४)शास्त्री,हरिगोविन्द (सम्पा.)(१९६१)शिशुपालवध.विद्याभवन संस्कृत ग्रन्थमाला-८,चौखम्बा,नवी दिल्ली. (५)साधले,ग.श(सम्पा.)(१९८७)उपनिषद् महावाक्यकोश.श्री सद्गुरु प्रकाशन,नवी दिल्ली. (६)सुखठणकर,वि.सी,बेलवलकर,श्री.कृ (सम्पा.)(१९५४)द महाभारत(क्रिटिकलइडिशन). भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर,पुणे. (७)सोनटक्के,ना.श्री,काशिकर.चि.ग(१९८३)ऋग्वेदसंहिता.वैदिक संशोधन मंडळ,पुणे. (८)स्वामी दयानन्द सरस्वती(१९७३),ऋग्वेद.दयानन्द संस्थान.नवी दिल्ली. टीप- समरादित्यसंक्षेप व द्व्याश्रयमहाकाव्य याचे नेमके सन्दर्भ (Title page missing) मुख/शीर्षक पृष्ठाच्या अभावी मिळू शकले नाहीत.परंतु डेक्कन कॉलेज संस्कृत-शब्दकोश प्रकल्पाच्या ग्रंथालयात ग्रंथनाम तालिकेतून(Title catalogue) हे ग्रन्थ/पोथी पाहता येतील.