विक्शनरी:धूळपाटी/मजेदार वाकप्रचार

प्रत्येक भाषेत खास वाक्प्रचार रूढ असतात. ते (निदान काही काळ) रूढ कसे होतात ह्याला काही उत्तर नाही.

आपापल्या मातृभाषेतले जे वाक्प्रचार आपण दररोज वापरत असतो त्यांपैकी काहींमधे थोडा "मजेदारपणा" असेल हे सामान्यतः आपल्या लक्षात येत नाही. भाषा लहानपणापासून अंगवळणी पडण्याचा हा प्रभाव असतो. फक्त लक्ष देऊन वाक्प्रचार वाचले-ऐकले असता त्यांपैकी काहींमधे जर थोडा "मजेदारपणा" असला तर तो आपल्याला जाणवतो. राम गणेश गडकरींनी "अंगाचा तिळपापड होणे", "अंगाच्या लाह्या होणे", अशा काही रूपकात्मक वाक्प्रचारांसंबंधात एक विनोदी लेख लिहिला होता.

मराठी भाषेतल्या काही मजेदार वाक्प्रचारांचा संग्रह संपादन

 • बाहेर पडणे
  आपण बाहेर पडतो तेव्हा बाहेर (ठेच लागून किंवा पाय घसरून) अगदी क्वचितच पडत असतो!
 • तोंडघशी पडणे
  "तोंडघशी पडणे" ह्या वाक्प्रचाराचा उगम ठेच लागून तोंडावर पडण्याच्या रूपकात असावा असे दिसते. पण मग "तोंडावर पडणे" असा सरळ वाक्प्रचार रूढ होण्याऐवजी रूढ झालेल्या वाक्प्रचारात तोंडाबरोबर घशाच्या उल्लेखाचे प्रयोजन?
 • गाठ पडणे, गरज पडणे
  दुसर्या माणसाशी झालेली गाठ होण्याऐवजी काही वेळा पडते तेव्हा पडते कशी? आणि गरज कशी पडते?
 • (टेबलावर) पडलेले पुस्तक
  पुस्तक माणसाच्या हातातून निसटून टेबलावर सहसा पडत नाही. "टेबलावर 'असलेले' (किंवा 'ठेवलेले)' पुस्तक" असे म्हणणे म्हटले तर अधिक उचित झाले असते!
 • पायात चप्पल घालणे, हातात मोजे घालणे, अंगात कपडे घालणे
  माणूस पायात चप्पल घालतो की चपलेत पाय? हातात मोजे घालतो की मोज्यात हात? अंगात कपडे घालतो की अंगावर?
 • पाऊल टाकणे
  "पाऊल टाकणे" ह्या रूढ वाक्प्रचारापेक्षा "पाऊल ठेवणे" असा वाक्प्रचार अधिक उचित ठरला असता. साप कात टाकतो तशा धर्तीवर माणूस कधी आपले पाऊल टाकत नाही.
 • धापा टाकणे
  माणसे पत्रे पोस्टाच्या पेटीत टाकतात; धापा कुठे टाकतात?
 • फिरायला जाणे
  आपण घराबाहेर "फिरायला जातो" तेव्हा भोवर्यासारख्या फिरक्या घेत बसत नाही! कोणी तशा (ballet dancer किंवा break dancerसारख्या) फिरक्या घेत राहील तर ते दृश्य पहायला लोकांचा घोळका नक्की तयार होईल!
 • फिरक्या घेत बसणे
  (break danceसारखी) फिरक्या घेत बसण्याची कल्पना मजेची आहे!
 • प्रेम बसणे
  (माणसाच्या मानगुटीवर रूपकात्मक रीत्या भूत बसते;) कोणा तरुणीवर कोणा तरुणाचे किंवा तरुणावर तरुणीचे प्रेम बसते का?
 • चित्र काढणे
  जादुगार हॅट्मधून ससा काढतो त्याच प्रकारे चित्रकार पेन्सिल वापरून कागदामधून चित्र काढतो अशा कविकल्पनेने कोणीतरी "चित्र काढणे" हा वाक्प्रचार प्रथम वापरला असेल का?
 • फेकून देणॆ
  नको असलेली वस्तू फेकून देण्याने दानाचे पुण्य पदरी पडत असावे का?
 • धुमाकूळ घालणे, वाद घालणे
  माणसे धुमाकूळ घालतात तेव्हा तो कशात घालतात? आणि वाद?
 • गांगरून जाणे
  गांगरलेला माणूस जातो कुठे?
 • डोके फिरणे
  माणसाचे डोके फिरते तेव्हा त्याचे डोके खांद्यावर फिरते?
 • डोके चालवणे
  माणसे मोटारी रस्त्यावर चालवतात, विमाने हवेत "चालवतात"; डोके रस्त्यावर चालवतात की हवेत?
 • (काहीतरी गहन वाचून) डोक्याचे खोबरे होणे
  "मेंदूचे खोबरे होणे" असा जर वाक्प्रचार असता तर तो अधिक समर्पक झाला असता! कारण मेंदूचे खोबर्याशी जास्त साम्य आहे आणि डोक्याचे नारळाशी!
 • कंड्या पिकवणे
  कच्चे आंबे पुरेसे पिकवण्याकरता तांदळाच्या ढिगात घालून ठेवतात. कंड्या पिकवण्याकरता दुसर्यांच्या कानात घालण्यात येतात!
 • बाता मारणे, पैज मारणे, मिटक्या मारणे, मजल मारणे, फेरी मारणे, टांग मारणे, ताव मारणे, डोळा मारणे
  बाता, पैज, मिटक्या, मजल, फेरी, टांग, ताव, डोळा ह्या गोष्टी मारण्याकरता माणसे पिस्तुल वापरतात की तलवार?
 • बस्तान ठोकणे, मांडी ठोकणे, आरोळी ठोकणे
  खिळा ठोकायला हातोडी वापरतात; बस्तान, मांडी, आरोळी ह्या गोष्टी ठोकायला?
 • काणाडोळा करणे
  दुर्लक्ष करण्याकरता एक डोळा (दामुअण्णा मालवणकरांसारखा) काणा करू शकण्याचे कसब कमावणारी व्यक्ती ह्या पृथ्वीतलावर कुठे आहे का?
 • कानाला खडा लावणे
  अनुभवातून धडा घेण्यासाठी कानाला खडा लावण्याचा विधी गमतीचा भासतो. मुख्य म्हणजे त्या विधीनुसार कानाला लावण्याकरता एखादा खडा मुद्दाम रस्त्यावर जाऊन शोधला पाहिजे!
 • दातओठ खाणे
  माणूस रागाने ओठ चावतो, पण रागाने स्वतःचे ओठ आणि त्याच्या जोडीला दातही खातो?
 • झोकांड्या खाणे, शिव्या खाणे, हाय खाणे, हार खाणे, पैसे खाणे
  झोकांड्या, शिव्या, हाय, हार, पैसे ह्या सगळ्या गोष्टी माणसे काकडीसारख्या कच्च्या खातात की भेंड्यांसारख्या शिजवून?
 • तोंडातून ब्र न काढणे
  'ब्रह्मदेव' किंवा 'ब्रश' सारखे काही शब्द वापरताना मराठीभाषिक तोंडातून कधीतरी 'ब्र' 'काढतात', पण तो काढण्या-न काढण्याचे खास महत्त्व ते काय?
 • नाकी नऊ येणे
  नऊनंतर नाकी दहा आले तर त्यायोगे माणसाची दमछाट आणि संत्रस्तता आणखीच वाढेल का?
 • हात दाखवणे
  हात नुसता दाखवून हाताने तडाखा दिल्याचा परिणाम कसा होणार?
 • चेहरा आंबट होणे
  कोणत्या तरी घटनेने चेहरा आंबट होतो की थोड्याश्या रूपकात्मक रीत्या काही तरी आंबट पदार्थ खाल्ल्यासारखा होतो?
 • जांभई देणे, ढेकर देणे, शिंक देणे
  जांभई, ढेकर, शिंक ह्या गोष्टी माणसाने दिल्यानंतर त्या गोष्टींचे दान स्वीकारण्यातून कोणाच्या मनात आनंदाची भावना निर्माण होत असेल?
 • डुलक्या घेणे, डुलक्या देणे
  माणसाने घेतलेल्या डुलक्यांचे दान करतो कोण, आणि दिलेल्या डुलक्यांचे दान स्वीकारतो कोण?
 • झोप ताणणे; किंवा ताणून देणे
  एकाद्या रबरी पट्ट्यासारखी झोप कोणी झोप ताणू शकते का? माणूस "ताणून देतो" तेव्हा त्याच्या शरीराचे स्नायू ताणलेले असतात की ढिले?
 • झोप उडणे
  झोपेतल्या स्वप्नांमधे माणूस काही वेळा उडून अंतराळात विहार करून येतो; पण झोप उडते?
 • पाठ धरणे
  "पाठ धरणे" हा वाक्प्रचार मराठीभाषिक दोन भिन्न तर्हांनी वापरतात : "पिच्छा पुरवणे" ह्या एका अर्थी, आणि "पाठीत उसण भरणे" ह्या दुसर्या अर्थी. दुसर्या माणसाचा पिच्छा पुरवताना कोणी त्याची पाठ हाताने धरतो का? आणि आपल्या पाठीत उसण भरली असता आपली पाठ हाताने धरताना कोणा माणसाला "पाठ धरणे" हा वाक्प्रचार सुचला असावा का?
 • पिच्छा पुरवणे
  हिंदीत "पीछा" म्हणजे "पाठलाग"; तेव्हा "पाठलाग करणे" ह्या वाक्प्रचारासमान "पिच्छा करणे" हा (जरा अधिक जोरकस) वाक्प्रचार योग्य ठरला असता. त्याऐवजी पिच्छापुरवणे?
 • हंबरडा फोडणे
  नारळ, बर्फ अशांसारख्या गोष्टी आपण काहीतरी हत्यार घेऊन फोडतो; पण हंबरडा फोडण्याकरता हत्यार?
 • सूंबाल्या ठोकणे, धूम ठोकणे
  आणि सूंबाल्या, धूम ह्या गोष्टी ठोकणारी माणसे त्याठोकण्याकरता कुठले हत्यार वापरतात?
 • फडशा पाडणे
  फडशाची तंगडी खेचून त्याला पाडण्यात येते की दुसर्या कोणत्या प्रकारे?
 • हसू येणे
  हसण्याची "येजा": आलेले हसू दहापंधरा सेकंदांनंतर गेल्याचे कोणी कधी म्हटल्याचे कोणाच्या ऐकिवात आहे का?
 • दिवा लावणे, भुणभुण लावणे
  दिवा, भुणभुण ह्या गोष्टी कशाला लावतात?
 • वाट लागणे, आग लागणे, चालू लागणे, मनाला लागणे, मारलेले लाटणे लागणे, पदार्थ चवदार लागणे, गहन लेखाचा अर्थ लागणे, पाठी लागणे, बोट हलू लागली असता ती लागणे
  एकाद्या मराठी-इंगजी किंवा मराठी-चिनी शब्दकोशात "लागणे" ह्या शब्दाचा अर्थ कोणी शब्दकोशकारांनी काय दिला असेल?
 • (हसून हसून) पुरेवाट होणे
  "पुरेवाटी"तली "वाट" आणि "वाट लागण्या"तली "वाट" ह्या दोन्ही वाटी एकच आहेत की वेगळ्या तर्हांच्या? पुरेवाट होण्यापूर्वी हसत असताना "चतकोरवाट", "अर्धवाट" हे टप्पे माणूस क्रमशः पोचत असतो का?
 • वाट पहाणे
  मित्राची "वाट पहाताना" तो ज्या कुठल्या वाटेने येण्याची जास्त शक्यता आहे ती वाट पहात कोणी काळ व्यतित करेल तर ते थोडेसे उमजण्यासारखे आहे, पण पत्राची "वाट पहाताना"?
 • (वस्तू) लांबवणे
  लांबवलेली वस्तू लांबवणार्याने (समजा पश्चात्तापाने) मालकाला परत दिली तर आकुंचित होऊन ती पूर्वीचा आकार धारण करेल का?
 • वारा सुटणे
  कैदेची शिक्षा संपल्यावर (किंवा शिक्षा संपण्यापूर्वी निसटून) गुन्हेगार कैदेतून सुटतो. वारा?
 • दिवाळे वाजणे
  दिवाळीतल्या फटाक्यांसारखे दिवाळे वाजते का?
 • फोडणी
  स्वयंपाकात फोडणी देताना नेमके काय फोडण्यात येते? मोहोरीची फोडणी तयार करताना मोहोर्या थोड्याश्या फुटतात खर्या. पण कांद्याच्या फोडणीत?
 • अंघोळ/आंघोळ
  अंघोळ/आंघोळीचे उद्दिष्ट अंग केवळ ओले करणे एवढेच असते क?
 • नवरदेव
  लग्नात वधूवरांपैकी वरदेवाचा नवरदेव --वरण्याला फारसा राजी नसलेला वरदेव?-- कधी होतो? आणि "वरदेव"-"नवरदेवां"सारखे "वधूदेवी"-"नवरीदेवी" असे शब्द कसे प्रचारात नाहीत?
 • भाऊबंदकी
  भाऊबंद म्हणजे आप्तजन. तेव्हा "भाऊबंदकी" ह्या शब्दाचा तर्कशुद्ध अर्थ "आपुलकी" असा ठरला असता! एकमेकांची हत्त्या सुकरपणे करण्याकरता मनुष्यप्राण्याने बंदुकांचा शोध लावल्यानंतर निदान "भाऊबंदुकी" असा शब्द मराठीत अधिक उचित झाला असता!
 • बिनडोक
  डोक्याच्या आतला माणसाचा मेंदू कोणाला दिसत नाही. तेव्हा मंदबुद्धीचा माणूस मुळात "बिनमेंदू"च असेल हा तर्क ठीक होईल. पण धडावर डोकेच नसलेला माणूस?
 • बाप रे!
  शारीरिक किंवा मानसिक दुःख झाले असता मराठीभाषिकांच्या तोंडून "आई ग!" असे उद्गार, आणि भीती, आश्चर्य ह्या भावना मनात निर्माण झाल्या असता "बाप रे!" असे उद्गार पुष्कळदा बाहेर पडतात. भीती/आश्चर्य वाटले असता (त्या भावनेची तीव्रता कमी करण्याकरता --संरक्षणार्थ-- आपले वडील जवळ असावेत ह्या अंतर्मनातल्या सुप्त इच्छेपायी) कोणी आपल्या वडिलांना बाप ही थोडी ओबडधोबड संज्ञा वापरून आणि शिवाय एकेरी संबोधून आवाहन करण्याची कल्पना गंमतीची आहे.
 • अरेच्या!
  ह्या उद्गाराची उपपत्ती हा पी.एचडी. पदवी मिळवण्याकरता संशोधनाचा एक विषय खास ठरेल!
 • अय्या! आणि इश्श!
  हे दोन उद्गार फक्त स्त्रीवर्गाच्या बोलीकरता राखून ठेवण्यात मराठी मायबोलीने पुरुषवर्गावर अन्याय केला होता!!! पण नव्या जमान्यात स्त्रीवर्गाच्या बोलीत विशेषतः 'इश्श' हा उद्गार अधिकाधिक अप्रचलित होऊन तो अन्याय वेगळ्या तर्हेने दूर होत असल्याचे दिसत आहे!
 • सिगरेट ओढणे
  सिगरेट ओढताना वास्तविक सिगरेटला एकादी दोरी बांधून ती न ओढता तंबाखूचा धूर माणूस आपल्या फुप्फुसांमधे ओढत असतो.
 • सिगरेट पिणे; धूम्रपान
  वाक्यातले कर्म अनुच्चारित राखून आणि फार तर हाताची चार बोटे तळव्याला चिकटवण्याच्या आणि ताठवलेला अंगठा तोंडाजवळ नेण्याच्या आविर्भावाने दारूची बाटली सुचवून पिणे हे क्रियापद मराठी माणसे काही वेळा वापरतात. "त्या" पिण्याच्या व्यसनाच्या काहीश्या सादृश्यातून घनरूपातली सिगरेट चहाकॉफीसारखी पिण्याची कल्पना कोणाला सुचली असावी का? धूम्रपानातला धूर असतो वायूरूप. तेव्हा सिगरेटचा धूर पिण्याची कल्पनाही तितकीच मजेची आहे. शिवाय कोणतेही पेय पोचते पोटात; "प्यालेली" सिगरेट किंवा "प्यालेला" धूर पोटात न पोचता सिगरेटची चाल ओठांच्या फाटकाकडे थांबते, आणि धूर पोचतो फुप्फुसांमधे. (जाता जाता सांगायची एक गोष्ट म्हणजे सिगरेटच्या धुरासमवेत अक्षरशः डांबराचे कणही फुप्फुसांमधे पोचत राहून तिथे कायमचे साचत रहातात; तेव्हा "हे" "पिण्या"चे व्यसनही "त्या" "पिण्या"च्या व्यसनासारखेच अतिघातक आहे.)